Akola: अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शहराचा वीज पुरवठा खंडित
By आशीष गावंडे | Published: November 27, 2023 06:07 AM2023-11-27T06:07:31+5:302023-11-27T06:07:50+5:30
Akola News: अकोला जिल्ह्यासह शहराला रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरा पर्यंत विजेचा कडकडाट व पाऊस सुरूच होता.
- आशिष गावंडे
अकोला - जिल्ह्यासह शहराला रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरा पर्यंत विजेचा कडकडाट व पाऊस सुरूच होता.
हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात तसेच अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये व काही दुकानांमध्ये शिरले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल केल्याचे दिसून आले. वादळी वाऱ्यामुळे जुने शहरातील काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या होत्या. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटले आहे. खरीप हंगामातील कपाशीसह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना त्रासदायक
रविवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे साथरोग बळावण्याची दाट शक्यता आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक त्रास लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना होणार आहे.