अकोला : पत्नीचा शारीरिक छळ करणारा शिक्षक पती कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:39 AM2018-01-29T01:39:52+5:302018-01-29T01:40:32+5:30
अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीस न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने विकृती शिक्षकाची कारागृहात रवानगी केली.
पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, गोरक्षण रोडवरील एका शाळेतील शिक्षकाचे तिच्यासोबत २३ मे २0११ रोजी लग्न झाले. लग्नानंतर एका महिन्याने पतीने तिचा छळ सुरू केला. पतीच्या वागण्यात सुधारणा होईल, या आशेने तिने माहेरकडील लोकांना छळाविषयी सांगितले नाही.
तिचा छळ सुरू असल्याने, ती अधूनमधून माहेरी पातूरला जात होती; परंतु पती हा नातेवाइकांच्या माध्यमातून पत्नीची समजूत घालून तिला घरी परत आणायचा. पती हा विकृत मानसिकतेचा असल्याने, पत्नीवर तो सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यासोबतच तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारसुद्धा करायचा. त्याच्या छळाला व अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली. त्यानंतर पतीने तिला धमकावले. अखेर पत्नीने तिच्या आई-वडिलांना पती बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. पीडितेने तिच्या आई-वडिलांसोबत गुरुवारी दुपारी खदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तिच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी पती आणि हुंड्यासाठी छळ करणारा सासरा, सासू, दोन नणंद आणि त्यांचे पती आदींविरुद्ध भादंवि कलम ३७७, ४९८ (अ) (३४) नुसार गुन्हा दाखल केला. पतीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. रविवारी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली.