लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने अकोला जिल्हय़ातील धरण साठे कोरडे आहेत. जूनपासून ही स्थिती उद्योजक आणि प्रशासनाच्या समोर होती. महान काटेपूर्णा धरणातून अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना पाणी पुरवठा होत असे. दरम्यान, पिण्यासाठी पाणी राखीव केल्याने खांबोरा प्रकल्पाच्या पाणी पुरवठय़ासोबतच एमआयडीसीचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे एमआयडीसीजवळच्या कुंभारी तलावातून उद्योगांना पाणी पुरवठा सुरू झाला. तो अजूनही तीन दिवसांआड काही तासांसाठी सुरू आहे. यादरम्यान अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि जागरूक उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष आगामी पाणीटंचाईकडे वेधले; मात्र एमआयडीसी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडू लागले आहेत. ही बाब एमआयडीसीतील फुड एक्स्पोच्या उद्घाटनादरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पंधरवड्यात याप्रकरणी मुंबईत बैठक आयोजीत केली आहे हे विशेष.
मिनरल प्लान्टकडून उपसा सुरूचपाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग बंद पडत असले, तरी येथील काही मिनरल प्लान्टकडून पाण्याचा उपसा सातत्याने सुरूच आहे. त्यांचा पाणी उपसा बंद करण्याची आणि परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्याची गरज अजूनही एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना भासलेली नाही.
अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या तातडीने सोडविली गेली नाही, तर मार्चपर्यंत अकोल्यातील ७५ टक्के उद्योग बंद पडतील. याला अकोला एमआयडीसीतील अधिकारी जबाबदार राहतील. पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक असली, तरी ती सोडविणे अशक्य मुळीच नाही. उद्योगमंत्री यांच्या बैठकीतही विहीर अधिग्रहणाचाच मुद्दा पुढे येणार आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.