अकोला: रेल्वे स्टेशन, बसस्टँडवर ‘लॉकडाऊन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:57 PM2020-03-22T17:57:29+5:302020-03-22T17:58:04+5:30
रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
अकोला: रविवारी सकाळपासूनच रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात पूर्णत: ‘लॉकडाऊन’ असल्याचे दिसून आले. रेल्वेच्या सकाळच्या गाड्यांमधून मोजकेच प्रवासी स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सकाळपासून तिकीट आरक्षण व तिकीट विक्री बंद केली. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर व फलाटांवर एकही प्रवासी दिसून आला नाही. सकाळी व दुपारी आलेल्या दोन रेल्वेगाड्यांनी कोलकोता, ओडिसा येथून आलेले सात-आठ प्रवासी हिंगोली, नांदेड आणि वाशिमला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षालयात थांबले होते. बसस्टँडवरसुद्धा एकही प्रवासी दिसून आला नाही. अकोला आगारातील सर्व बसगाड्या लगतच्या वॅर्कशॉपमध्ये जमा करण्यात आल्या होत्या. प्रवासीच नसल्यामुळे बाहेरगावी बसगाड्या सोडण्यात आल्या नाहीत. एकंदरीतच रेल्वे स्टेशन आणि बसस्टँड परिसरात शुकशुकाट दिसून आला.
प्रवासी अडकले, सायंकाळच्या रेल्वेने परतले!
रेल्वे स्टेशनवरील दोन फलाटांवर कोलकोता, ओडिसा आणि पुणे येथून आलेले दहा ते बारा प्रवासी थांबलेले होते. बससेवा बंद असल्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशनवरच थांबावे लागले. सायंकाळी रेल्वेगाडी असल्याने हे प्रवासी रेल्वेगाडीने वाशिम, हिंगोली, नांदेड व वर्धा येथे परतले.
रेल्वे स्टेशनवर रेस्टॉरंट, हॉटेल सुरू
बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना ‘जनता कर्फ्यू’चा फटका बसू नये किंवा त्यांना असुविधा होऊ नये, यासाठी रेल्वे स्टेशनवरील रेस्टॉरंट, हॉटेल सुरू होते. त्यामुळे बाहेरगावच्या प्रवाशांना दिलासा मिळाला. रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरातील हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्यात आले होते.
रेल्वे स्टेशनवर ४८0 प्रवाशांची तपासणी
रेल्वेगाडीने अकोल्यात येणाºया प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत रविवारी तपासणी करण्यात येत होती. या ठिकाणी डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आले होते. दुपारी ४ वाजतापर्यंत ४८0 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकही प्रवासी कोरोना संशयित आढळून आला नाही.
एसटीची चाके थांबली!
बसस्टँडवर एकही प्रवासी न फिरकल्यामुळे रविवारी सकाळपासूनच एसटी महामंडळाने एकही बसगाडी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सोडली नाही. तीन दिवस ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे बसगाड्या सोडण्यात येणार नाही. अत्यावश्यक सेवा असेल तर बसगाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतवने यांनी सांगितले.