अकोल्याचे कमाल तापमान पोहोचले ४३.९ अंशावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:38 AM2020-04-17T10:38:46+5:302020-04-17T10:38:53+5:30
१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४३.९ अंशावर पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोल्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, गुरुवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४३.९ अंशावर पोहोचले. उन्हाचा चांगलाच कडाका वाढला असताना यावर्षी अद्याप कूलर सुरू झाले नसल्याचे शहरातील चित्र आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळाबंदी घोषित केली आहे. २१ दिवसांच्या या बंदीनंतर पुन्हा ३ मेपर्यंत टाळाबंदी आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे कूलर सुरू करणे अशक्य आहे; परंतु ज्यांच्याकडे कूलर आहेत, तेदेखील लावत नसल्याचे चित्र आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरवी फेब्रुवारी महिन्याचा शेवटी अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमखास कूलर घरी सुरू करणारे आता थंड हवा या विषाणूला पोषक ठरू नये म्हणून अनेकजण कूलर लावण्याचे टाळत आहेत. अशातच अकोल्यात उन्हाचा कडाका वाढतच आहे.
फेब्रुवारी महिन्यात वातावरण विषम होते. कधी पाऊस तर कधी ऊन असा खेळ सुरू होता. मार्च महिन्यातही यावर्षी अपेक्षित तापमान नव्हते. तथापि, एप्रिल महिना सुरू होताच ५ एप्रिल रोजी हे तापमान ३९.६ डिग्री सेल्सिअस होते. तेव्हापासून तापमानात वाढ सुरू झाली. ६ एप्रिल रोजी कमाल तापमानात ४१.४ पर्यंत वाढ झाली. ७ एप्रिल रोजी एक अंशाने घटून हेच तापमान ४०.८ पर्यंत आले.
८ एप्रिल रोजी ४०.२ तर ९ एप्रिल रोजी ४१.३ पर्यंत वाढ झाली. १० एप्रिलला ४१.३, ११ ला ४२.० तर १२ एप्रिल रोजी ४२.८ वर पोहोचले. १३ एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त ४३.८ पर्यंत पारा वाढला. १४ ला ४३.४ पर्यंत हे कमाल तापमान होते. १५ ला ४३.३ तर १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत हे कमाल तापमान ४३.९ अंशावर पोहोचले आहे.
कूलरचा व्यवसाय बुडाला!
अकोल्याचा उन्हाळा बघता प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच कुलर खरेदी दुरुस्ती, कूलरला लागणारे गवत, अकोल्यात जोरात असतो. तथापि, यावर्षी कोरोनामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय ठप्प पडला आहे. नागरिकही कूलर लावण्यास टाळत असल्याचे चित्र आहे.