लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एमआयडीसीतील भूखंडावर होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाच्या घटनेनंतर आता एमआयडीसीतील अनेक घबाड चव्हाट्यावर येत आहेत. एमआयडीसीतील भूखंड वाटपात दलालांची जास्त चलती असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. अकोला एमआयडीसी फेस क्रमांक-४ मधील एन-१६0 क्रमांकाचा सुनील चिराणीया यांचा भूखंड प्रादेशिक अधिकार्यांनी परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला. याबाबत सखोल चौकशी केली, तेव्हा हा भूखंड परस्पर तिसर्यालाही विकला गेल्याचे समोर येत आहे. याचा मागोवा घेतला असता कोणत्या उद्योजकांचे भूखंड ठेवायचे आणि कुणाचे घालवायचे, याचे निर्णय काही दलाल घेत असल्याचे धक्कादायक माहिती मिळाली आहे. एमआयडीसीच्या अकोला, अमरावती, मुंबई कार्यालयातही या दलालांचा दबदबा कायम आहे. एमआयडीसीने ऑनलाइन भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू केली असली, तरी अजूनही भूखंड वाटपात अफरातफरीचे अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे गरजवंत आणि नियमाने भूखंड घेण्याचा प्रयत्न करीत असलेल्या उद्योजकांवर अन्याय होत आहे. चिराणीया यांच्या प्रकरणातही त्यांना अकोल्यातील काही दलालांनी गळ घालून प्रकरण निपटविण्याचे सांगितले होते; मात्र त्याला भाव न दिल्याने दलाल आणि अधिकारी यांनी संगनमत करून त्यांचा भूखंड दूसर्यालाच अलॉट केला. विशेष म्हणजे ज्यांना हा भूखंड अलॉट केला होता त्यांच्याकडून तोच भूखंड दलालांनीच खरेदी केल्याचे समोर येत आहे.
अधिकार्यांवर दलालांची पकड अकोला शहरातील प्रमुख सात दलालांचीच एमआयडीसीच्या कामात चलती आहे. एमआयडीसीतील कोणतेही काम या दलालांशिवाय पूर्ण होत नाही. अमरावती आणि मुंबईतील कार्यालयात जाऊन हे दलाल पाहिजे त्या पद्धतीचे आदेश, शुद्धिपत्रक, दंडात्मक कारवाई करवून आणतात. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकार्यांपेक्षा दलालांचीच पकड मजबूत आहे.