अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ प्रकृती अस्वास्थ्यामुळे २६ आॅक्टोबरपर्यंत रजेवर असल्याने आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.मागील अनेक दिवसांपासून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे. गणेशोत्सवानंतर त्यांनी पुणे येथे जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अकोल्यात आल्यानंतरही त्यांनी कार्यालयात न येता निवासस्थानातून प्रशासकीय कामकाज सांभाळले. अमृत योजनेचा आढावा घेण्यासाठी ६ आॅक्टोबर रोजी केंद्राची चमू अकोल्यात आली असता, त्यांनी महापालिकेत येऊन चमूतील सदस्यांसोबत चर्चा केली. यावेळी काही अत्यावश्यक कामांच्या देयकांसह मनपाच्या वर्ग-३, वर्ग-४ व मानसेवी कर्मचाºयांचे प्रलंबित वेतन अदा करण्याला मंजुरी दिली. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी पुन्हा ७ आॅक्टोबर रोजी पुणे येथे जाणे पसंत केले. तेव्हापासून ते रजेवर आहेत. येत्या २६ आॅक्टोबरपर्यंत ते रजेवर असून, महापालिकेची सूत्रे २९ आॅक्टोबर रोजी स्वीकारण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागात हालचाली सुरू आहेत.