अकोला : शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या गृहभेटीकडे महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने सपशेल पाठ फिरवल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. काेराेनाची लागण झालेल्या व हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची आराेग्य तपासणी करणे, घराचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याला वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने ठेंगा दाखवल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे. अशा स्थितीत या विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे.
शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोना बाधित रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या इत्थंभूत माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून कोरोना बाधित रूग्णाची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्व सूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे,बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना हा विभाग कुंभकर्णी झाेपेत असल्याची बाब समाेर आली आहे. शहरात काेराेना बाधितांची संख्या वाढत चालली असताना मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा नेमके कोणते कर्तव्य बजावत आहे, यावर प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पालकमंत्र्यांसमोर प्रशासन तोंडघशी
सुरूवातीच्या कालावधीत काेराेना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये भीती व धास्ती हाेती. एप्रिल ते जून महिन्यांत ुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला शहरात हाॅटस्पाॅट ठरलेल्या प्रभागातील रहिवाशांची आराेग्य तपासणी माेहीम राबविण्याचे निर्देश दिले हाेते. वैद्यकीय यंत्रणेने अतिशय थातूरमातूर पध्दतीने माेहीम राबवून गाशा गुंडाळला. या माेहिमेत किती जणांची तपासणी केली, याबद्दल तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांना चुकीची माहिती सादर केली हाेती. ही माहिती पालकमंत्र्यांसमाेर सादर करताना प्रशासन ताेंडघशी पडले हाेते,हे विशेष.
पाॅझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीचा संभ्रम
मनपा प्रशासनाने प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्याकडे संनियंत्रण अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. या विभागाकडे शहरातील पाॅझिटिव्ह रुग्णांची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. तसेच दरराेज किती पाॅझिटिव्ह रुग्णांची घरी जाऊन पाहणी केली, घराचे निर्जंतुकीकरण केले का,याबद्दल हा विभाग अनभिज्ञ असल्याची परिस्थिती आहे.