लाॅन, मंगल कार्यालयांतील लग्न साेहळ्यांवर महापालिकेचा ‘वाॅच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:55 AM2020-12-27T11:55:50+5:302020-12-27T11:59:56+5:30
Akola News आयाेजकांसह हाॅटेल, मंगल कार्यालयांच्या संचालकांवर कारवाईचे निर्देश जारी केले आहेत.
- आशिष गावंडे
अकाेला : जिल्हा प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीनुसार केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवित आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र समाेर आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील मंगल कार्यालये, लाॅन, हाॅटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी आयाेजित लग्नसाेहळा, इतर कार्यक्रमांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आढळल्यास आयाेजकांसह हाॅटेल, मंगल कार्यालयांच्या संचालकांवर कारवाईचे निर्देश जारी केले आहेत.
शहरात दिवसेंदिवस काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत हाेणारी वाढ चिंताजनक मानली जात आहे. अशा स्थितीत ब्रिटनमध्ये काेराेना विषाणुमध्ये जनुकीय बदल हाेऊन त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापृष्ठभूमीवर राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, जिल्हा आराेग्य यंत्रणा व महापालिकेला खबरदारी बाळगण्याचे निर्देश जारी केले आहेत. दिवाळीनंतर शहराच्या विविध भागांत काेराेनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, ही धाेक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, काेराेनाच्या ‘मिशन बिगेन’अंतर्गत नियमावलीचे पालन करीत जिल्हा प्रशासनाने केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या परवानगीचा गैरफायदा उचलत मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅनमध्ये वधू व वर पित्यांकडील नातेवाइकांची खच्चून गर्दी हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. ही गर्दी काेराेनाच्या प्रसारासाठी हातभार लावत असल्याची माहिती आहे.
वधू-वर पित्यांवर कारवाई
काेराेना विषाणूची लागण हाेऊन शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे ध्यानात घेता लग्न साेहळ्यात नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास थेट वधू व वराच्या पित्यांवर माेठा आर्थिक दंड आकारण्याचे निर्देश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत.
...तर परवाना हाेणार रद्द
शहरातील हाॅटेल, लाॅन व मंगल कार्यालयात ५०पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आयुक्तांनी परवाना विभागाला दिले आहेत. आगामी दिवसांत परवाना विभाग किती व्यावसायिकांचा परवाना रद्द करतात, हे कारवाईअंति दिसून येणार आहे.
‘मिशन बिगेन’अंतर्गत ५० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करणे अपेक्षित आहे. तसे हाेत नसल्याने कारवाईचे निर्देश दिले आहेत.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा