अकोला महापालिकेत विरोधी पक्षाची हवा गूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:58 AM2017-12-07T00:58:33+5:302017-12-07T01:06:23+5:30
शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे. सत्ताधार्यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून शहरासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी विरोधी पक्षाने निभावणे अपेक्षित आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्तपद मागील अनेक दिवसां पासून रिक्त आहे. तसेच शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे. सत्ताधार्यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग निष्क्रिय असल्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाचे सफाई कर्मचारी मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची झाडपूस करत नसल्याने रस्त्यांवर धुळीचे ढीग साचले आहेत. धुळीमुळे अकोलेकरांना श्वसनाचे आजार जडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. प्रभागातील नाल्या, गटारांची नियमित साफसफाई होत नसून, सांड पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. धरणात जलसाठा कमी असल्याने नागरिकांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंतही नवीन अधिकार्यांची नियुक्ती झाली नाही. मनपाचे दोन्ही उपायुक्त पद रिक्त आहेत. महापालिकेचे एकूणच चित्र पाहता विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असताना सत्ताधार्यांसह विरोधी पक्षांनी साधलेल्या चुपीमुळे अकोलेकरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. प्रशासकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याचा स्थानिक कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. प्रशासनाचा ढेपाळलेला कारभार व सत्ताधार्यांच्या भूमिकेवर विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने हल्लाबोल करणे अपेक्षित असताना विरोधकांनी तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. सत्ताधार्यांसमोर विरोधी पक्ष हतबल ठरत असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शासनाकडे दाद कधी मागणार?
महापालिकेसह राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही महिनाभरापासून मनपाचे आयुक्त पद रिक्त कसे, असा सवाल विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी उपस्थित केला होता. सत्ताधार्यांनी आयुक्तपदी नवीन अधिकार्यांची नियुक्ती न केल्यास काँग्रेसच्यावतीने आम्ही शासनाकडे दाद मागणार असल्याचे साजिद खान यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले होते. मनपाचा ढेपाळलेला कारभार पाहता विरोधी पक्षने ता शासनाकडे कधी दाद मागणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
मुख्य रस्त्यांची झाडलोट नाहीच!
प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची दररोज झाडलोट करणे महा पालिकेच्या सफाई कर्मचार्यांना क्रमप्राप्त आहे. अंतर्गत रस्त्यांची कधीही झाडलोट होत नाही. मुख्य रस्त्यांची पंधरा दिवसातून एखाद्या वेळी थातूरमातूरपणे झाडलोट केल्यानंतर माती उचलून न नेता दुभाजकालगत साचवून ठेवतात. वाहनांमुळे हीच माती पुन्हा रस्त्यावर येते. यासह विविध समस्या असताना यापैकी एकाही समस्येवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही.
-