अकोला : मुलगी, पत्नी, सासरच्या मंडळीने केली इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:59 AM2018-01-02T01:59:40+5:302018-01-02T02:00:01+5:30
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भौरद रोडवर निर्माणाधीन असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर फेकला. या प्रकरणात अवघ्या काही तासातच अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भौरद रोडवर निर्माणाधीन असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर फेकला. या प्रकरणात अवघ्या काही तासातच अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपींना अटक केली आहे.
अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार असलेल्या इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल (३५, रा. शंकर नगर) याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता. त्याला तीन मुली व एक मुलगा असून, सहा वर्षांपासून त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहते. त्याच्या १७ वर्षाच्या मुलीसह दोन्ही मुलींचा ताबा घेण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तो पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला; मात्र रात्रीच्या सुमारास सासरा शेख मोहम्मद शेख रन्नू, सासू शयदाबी शेख मोहम्मद, साळू गुलाम चांद गुलाम रियाझ, पत्नी शबाना परवीन इलीयास पटेल व मुलगी शबनम परवीन इलीयास पटेल या पाच जणांनी मिळून त्याच्यावर लोखंडी रॉडने आणि कुर्हाडीने हल्ला चढविला.
या हल्ल्यात इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकर्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतहेद भौरद येथील निमार्णाधीन पुलाजवळ नेऊन फेक ला.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या आईला घटनास्थळावर नेले असता, तिने मृतदेह मुलाचा असल्याचे ओळखले. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा सासरा, सासू व मृताची १७ वर्षाची मुलगी यांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी साळा हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ अमीर हसन पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मो. शेख रन्नू (सासरा), शाहिदाबी शेख मोहम्मद (सासू), गुलाम चाँद गुलाम रियाज (साडू), शबाना परवीन इलियास (पत्नी) व १७ वर्षाची मुलगी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात अकोट फैलचे ठाणेदार संजीव राऊत करीत आहेत.
हत्येचे कारण गुलदस्त्यात
इलियास हा दारू पिऊन आला म्हणून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र या हत्याकांडामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याची माहिती आहे. मुलगी व पत्नीने पित्याची हल्ला केल्याने सदर हत्येमागे दारूच्या व्यसनासोबतच आणखी दुसरे ठोस कारण असल्याची चर्चा आहे. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत या हत्याकांडातील ठोस कारण समोर आले नाही.
हत्याकांडातील दोघे फरार
इलियास याच्या हत्याकांडात पोलिसांनी सासू, सासरे व पत्नीस अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी त्याचा साळा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर मुलगी १७ वर्षीय असून, तिच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे.
१५ दिवसांत पाच हत्या
जिल्हय़ात गत १५ दिवसांच्या कालावधीत पाच हत्याकांड घडले. यामध्ये प्रशांत निंघोट, शैलेश अढाव, सुमन नक्षणे व कृषी नगरातील एका महिलेच्या डोक्यात पाटा घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर सोमवारी पहाटेच इलियास याचे हत्याकांड समोर आल्याने गत १५ दिवसांमध्ये पाच हत्याकांड घडल्याचे दिसून येत आहे