अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूंदी मिळत नसल्याने आता सर्व्हिस रोडचा नवा पेच निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडच्या रूंदीबाबतच्या निर्णयात बदल करावा, त्यामुळे अनेक शहरातील समस्या दूर होतील, अशा आशयाचे निवेदन अकोला क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी, महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनास दिले.पूर्वी महामार्गाचे लेआउट करताना ४५ मीटर चौपदरीकरणाची रूंदी आणि १२ मीटर सर्व्हिस रोड गृहित धरला गेला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने आता चौपदरीकरणाची रूंदी ६० मीटर केली आहे. त्यामुळे दोन्हीकडे साडेसात मीटरची रूंदी वाढविली जाणार आहे. त्यानंतर महामार्गाला समांतर जाणारा शहरातील सर्व्हिस रोड १२ मीटरचा अतिरिक्त तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व्हिस रोड शहरातून जात असताना एवढी जागा पुन्हा अधिग्रहित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले, तर सर्व्हिस रोडच्या मुख्य उद्देशालाच छेद जाईल. त्या भागातील वाहतूक आतल्या आत झाली पाहिजे आणि अपघाताच्या घटनांवर अंकुश बसावा, म्हणून शहरातील महामार्गावर सर्व्हिस रोड काढले जातात; मात्र पुरेशी जागा अधिग्रहित करता येत नसल्याने सर्व्हिस रोड महामार्गाच्या भागावर ओव्हरलॅप होणार आहे. आधीच्या लेआउटनुसार सर्व्हिसमध्ये विसंगती निर्माण होत आहे. १२ मीटरऐवजी सर्व्हिस रोड साडेचार मीटरचा करणे शक्य होईल. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा सूर आवळला जात आहे. अकोला शहरातील एमआयडीसी, मलकापूर, खडकी, सर्व्हिस रोड जाणार आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची रूंदी कमी केल्यास तो कायम सारखा राहू शकतो.
६० मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड सोडावा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण शहरातून जात असताना ६० मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड सोडावा, असा नियम आहे. मात्र, काही ठिकाणी जागा नसेलच, त्या ठिकाणी तो कमी होऊ शकतो, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होऊ शकतो, असे अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले आहे.