लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बाहय़ोपचार विभाग (ओपीडी)ची अधिकृत वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची असली, तरी नियमित वेळेपूर्वीच या विभागाचे द्वार रुग्णांसाठी बंद केले जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ओपीडी दुपारी १.३0 वाजताच बंद करण्यात आल्यामुळे उशिरा आलेल्या अनेक रुग्णांना आल्या पावली परत जावे लागले. दरम्यान, रुग्ण नसल्यामुळे ‘ओपीडी’ बंद करण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.पश्चिम विदर्भातील मोठय़ा शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाचा जिल्हय़ातील गोरगरिबांना मोठा आधार आहे. केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा जिल्हय़ातूनही येथे मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. ओपीडीची क्षमता १२00 रुग्णांची असली, तरी येथे दररोज जवळपास दोन हजारांवर रुग्ण उपचारासाठी येतात. मुळात या रुग्णालयात डॉक्टरांसह सर्वच पदे रिक्त असल्यामुळे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ओपीडीचे वेळापत्रक कोलमडते. रुग्णालयाच्या ‘ओपीडी’ची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची आहे; परंतु या वेळा पाळल्या जात नाहीत. सकाळी १0 वाजेपर्यंत ओपीडीमधील अनेक कक्षांमध्ये डॉक्टरच येत नसल्याच्या तक्रारी आहेत. मंगळवार, १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच ओपीडीची कवाडे बंद झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. ओपीडी बंद झाल्यानंतर अपघात कक्ष सुरू असतो. या ठिकाणी मात्र अव्याहतपणे रुग्ण सेवा सुरू राहत असल्यामुळे रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
१ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणीयासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला. दुपारी १ वाजेपर्यंत येणार्या रुग्णांची नोंदणी केल्या जाते. एक वाजेपर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी साधारणत: २ वाजेपर्यंत चालते. मंगळवारी, दीड वाजताच नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी संपल्यामुळे ओपीडीमधील डॉक्टर निघून गेले, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मनुष्यबळाचा अभावभारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)च्या मानकानुसार या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात डॉक्टरपासून ते सफाई कामगारांपर्यंतची २२३६ पदे असणे गरजेचे आहे, तर वैद्यकीय महाविद्यालयात १११५ पदे असावयास हवी. परिस्थिती मात्र वेगळीच आहे. ओपीडीची क्षमता १२00 असताना दररोज दोन हजारांवर रुग्णांची नोंद होते. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मोठय़ा संख्येने येणार्या रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचे वास्तव आहे.