अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच झाल्या. अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या या खेळाडूंचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाइचा, जि. धुळे येथे नुकत्याच २२ ते २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत धनुर्विद्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अकोला धनुर्विद्या संघटनेद्वारे सावित्रीबाई फुले कन्या शाळा अकोला येथे चालत असलेल्या अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडंूनी घवघवीत यश संपादित केले. दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळविली. या स्पर्धेत १४ वर्षे इंडियन राउंड मुलांमध्ये सूरज खानझोडे याने एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदके पटकावून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक घेतला. आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच १९ वर्षे इंडियन राउंड मुलांमधून प्रेम भातारकरने सांघिक गटात एक सुवर्ण पदक तर १४ वर्षे कम्पाउंड राउंड मुलींमधून संचिता मोठे हिने सांघिक गटात एक रौप्य पदक व १४ वर्षे फिटा राउंड मुलींमधून ऋचा बोंडेने सांघिक गटात एक रौप्य पदकाची कमाई केली. जिल्हा प्रशिक्षक प्रणव नंदकिशोर बहादुरे व सहप्रशिक्षक राजेश्वर भांडे यांचे प्रशिक्षण तर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे प्रा. तुकाराम बिरकड, अॅड. विलास वखरे, शत्रुघ्न बिरकड, राजेंद्र जळमकर यांचे मार्गदर्शन लाभले. अकोला रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होताच जिल्ह्यातील धनुर्विद्या खेळाडू व पालकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी धनुर्विद्या खेळाडू कंजल पवरे, गार्गी पागृत, श्रेयश भोकर, हिमांशू देशमुख,राजाश्रीशाहु कांबळे, शिव ढवळे, अभय अहिर, हेरंभ सूर्यवंशी, आराध्य मते यांच्यासह पालक अतुल पवरे, उज्ज्वल पागृत, ज्ञानसागर भोकरे, दीपक सूर्यवंशी, अविनाश मते व नंदकिशोर बहादुरे उपस्थित होते.
धनुर्विद्या स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 4:38 PM