लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून तो खामगावनजीक पकडला.मारोती नगर येथील रहिवासी किशोर गोविंदराव मगरे यांचा एम एच ३0 एबी ६११ क्रमांकाचा ट्रक त्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता घरासमोर उभा केला. घरी जेवण करून ते ट्रक घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ट्रक घेऊन पळ काढला. किशोर मगरे यांचा मुलगा बाळापूर नाक्यावर उभा असताना त्याला ट्रक दुसराच कुणीतरी व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. त्याने तातडीने वडिलांना फोन करून विचारले असता ट्रक चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी ट्रक चोरीची माहिती तातडीने जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. जुने शहरचे पोलीस अधिकारी सतीश पाटील हे रात्रगस्तीवर असताना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रकचा पाठलाग सुरू केला. सुसाट जात असलेल्या ट्रक चालकाची माहिती बुलडाणा व खामगाव पोलिसांना दिली. त्यांनीही नाकाबंदी केली, मात्र त्यांच्या नाकाबंदीतूनही हा ट्रक पळाला. ट्रकच्या मागावरच असलेले सतीश पाटील यांनी ट्रकला मागे टाकल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. पाटील यांच्या कार्यत्परतेने हा ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले. या ट्रकमध्ये तब्बल ४0 लाख रुपयांचे साहित्य असून, ट्रकची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. ट्रक पळविणार्या चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सतीश पाटील यांनी केला पाठलागजुने शहरमध्ये कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी रात्रगस्तीत तातडीने निर्णय घेऊन चोरीस गेलेल्या ट्रकचा पाठलाग केला, त्यामुळे हा ट्रक पकडण्यात आला; अन्यथा ट्रकसह हे साहित्य मिळाले नसते, अशी प्रतिक्रिया किशोर मगरे यांनी दिली. पाटील यांनी तातडीने ट्रकचा पाठलाग करतानाच बुलडाणा व खामगाव पोलिसांचीही मदत घेतल्याने ट्रक पकडण्यात आला.