मध्यवर्ती कारागृहात केले एक वर्षासाठी स्थानबद्ध
सचिन राऊत
अकोला : अकोल्यात वाढलेली गुंडगिरी कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर अकोल्यात आल्यानंतर त्यांनी गत १० महिन्यांच्या कालावधीत तब्बल २८ गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पोलिसांमध्ये अकोला पोलिसांची कामगिरी ही अव्वल असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे. मकोका या कारवाईनंतर एमपीडीए ही कारवाई गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
अकोल्यात कोरोना कालावधीत दर तीन दिवसांआड एक हत्या होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे या गुंडावर कठोर कारवाई करण्यासाठी गत तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. मात्र, गत दोन वर्षांत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून, हत्येसह हाणामारी व दंगलीच्या घटना वाढल्या होत्या. अशातच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला पोलीस दलाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर अकोल्यातील गुंडगिरी कमी करण्यासाठी त्यांनी गुंडांची कुंडली गोळा केली. ज्या गुंडांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, तसेच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईलाही ते जुमानत नाहीत अशा गुंडांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचे प्रस्ताव तयार केले. जुलै २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील तब्बल २८ गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल २८ गुंडांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मोठ्या शहरांमध्येही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अकोला पोलिसांनी केलेल्या कारवाया राज्यात क्रमांक एकवर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बीडचा नंबर दुसरा
बीड जिल्ह्यात बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ११ गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली होती. त्याखालोखाल २ ते ३ कारवाया झालेल्या आहेत. यावरून काही जिल्ह्यांतील पोलीस गुंडांचा कायद्याने बंदोबस्त करण्यात हयगय करीत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदिल
पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी गत काही कालावधीत तब्बल २८ गुंडांवर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित केली. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या कारवाईला हिरवी झेंडी दिली. त्यामुळे अकोल्यातील गुंडगिरी बऱ्याच अंशी संपुष्टात आणण्यात यश आले आहे.
१० वर्षांत ०५, तर १० महिन्यांत २८ एमपीडीए
अकोला पोलीस दलाने यापूर्वीच्या १० वर्षांच्या कालावधीत केवळ ०५ गुंडांवर एमपीडीएची कारवाई केलेली आहे, तर मागील दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल २८ गुंडांवर ही कारवाई केल्याने मोठ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी चांगलाच बंदोबस्त लावल्याची चर्चा आहे.
अकोल्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व कायदे वापरून गुंडांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित भावना निर्माण व्हावी, महिलांनाही आपले शहर सुरक्षित वाटावे म्हणून शहराच्या मध्यभागी, तसेच बाजारपेठेत गुंडगिरी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचा सपाटा यापुढेही कायम राहणार आहे.
जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक अकोला