लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोडवरील एका टोळक्याने मंगळवारी दुपारी नंदाने मंगल कार्यालयानजीक असलेल्या एका औषधे दुकानात भरदिवसा प्रचंड राडा केल्याची घटना घडली. या टोळक्याने औषधे दुकानातील युवकास बेदम मारहाण केली असून, युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. युवकाला मारहाण करताना या सात ते आठ जणांच्या टोळक्याने पोलीसही आमचे काही बिघडवत नसून, आमचे गुलाम असल्याची भाषा वापरल्याने या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत.डाबकी रोडवरील रहिवासी अक्षय टेकाडे यांचे ए. टी. मेडिकोज नावाचे औषधे प्रतिष्ठान आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये शुभम कानकिरड व त्याचे सात ते आठ साथीदार घुसले. त्यांनी औषधांची फेकाफेक करीत अक्षय यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्षय टेकाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. टेकाडे यांना बेदम मारहाण केल्याचे डाबकी रोड पोलिसांना माहिती पडताच त्यांनी या युवकास सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. अक्षय टेकाडेवर उपचार सुरू असून, तक्रारीनंतर रात्री उशिरा शुभम कानकिरड व त्याच्या साथीदारांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२५, ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार सुनील सोळंके यांनी सांगितले.
कानकिरडची दादागिरी वाढली!शुभम कानकिरड याच्यावर यापूर्वीही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कानकिरड हा काही युवकांना सोबत घेऊन या परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांची असून, त्यांनी कानकिरडवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शुभम कानकिरडची दादागिरी प्रचंड वाढली असून, ही दादागिरी या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवसेना पदाधिकार्याचे पाठबळडाबकी रोडवर एका टोळक्याची प्रचंड दादागिरी वाढली असून, शिवसेनेच्या एका पदाधिकार्याचे पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या या पदाधिकार्यामुळेच हे टोळके परिसरात धुडगूस घालीत असून, पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेनेचा हा पदाधिकारी करीत असल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकरणात स्वत: पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.