अकोला : कोविड लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत अकोला राज्यात १६ व्या स्थानी होते. गत आठवडाभरात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याने अकोला चौथ्या रँकवर आला आहे. पहिल्या तीन क्रमांकावर विदर्भातीलच जिल्हे असल्याने लसीकरणाच्या बाबतीत राज्यात विदर्भाने आघाडी मारल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणात कोविन ॲपमधील तांत्रिक अडचण तसेच लाभार्थींमधील उदासीनतेमुळे कोविड लसीकरणाचा आकडा कमी दिसून आला. यामध्ये अकोला जिल्हा १६ व्या स्थानी होता, मात्र गत आठवडाभरात अकोल्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. लसीकरणाच्या बाबतीत विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. त्यानंतर अकोला चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
ज्येष्ठांच्या लसीकरणामुळे लसीकरणात आणखी सुधारणा
जिल्ह्यात साेमवारपासून ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात झाली. इतर लाभार्थींच्या तुलनेत ज्येष्ठांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत अकोल्यासह विदर्भाची स्थिती आणखी चांगली होण्याची शक्यता आहे.
गत आठवडाभरापूर्वी लसीकरणाच्या बाबतीत अकोला जिल्हा १६ व्या स्थानी होता, मात्र आठवडाभरात लसीकरणाचे काम चांगले आहे. त्यामुळे जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर आला. विशेष म्हणजे अकोल्यापुढे विदर्भातीलच भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्हे आहेत. त्यानुसार, राज्यातील विदर्भाची स्थिती चांगली आहे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला