लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याकडून त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला व पुरूष सहकार्याचा गत चार वर्षांपासून अश्लील वर्तन करून छळ सुरू असल्याचा प्रकार महिला कर्मचार्यानेच बुधवारी उघडकीस आणला. तिने कोतवाली पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरंजन खंडारे याला अटक करण्यात आली. महिला कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात कार्यरत आहेत. या ठिकाणी असलेला वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे हा गत चार वर्षांपासून कार्यालयातील महिलांकडे पाहून अश्लील हातवारे करतो. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत एका सहकारी लिपिकाकडून शर्टाचे बटन उघडून मसाज करून घेतो. महिलांकडे पाहून, अश्लील शिवीगाळ आणि अपशब्द वापरतो. एवढेच नाही तर तो कार्यालयामध्ये बसून सहकारी पुरूष कर्मचार्यांसोबत मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहून महिलांना उद्देशून अश्लील भाषेत संवाद साधतो, तसेच महिला कर्मचार्यांसमोर पॅन्ट वर करून सहकारी लिपिकाकडून मसाज करून घेतो. यासोबतच त्याने कार्यालयात काम करणार्या महिलांना अश्लील टोपण नावे ठेवली असून, त्यांच्या माघारी तो महिलांची टोपण नावे घेऊन अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोपही या महिला कर्मचार्याने केला आहे. कार्यालयातील सर्व महिला व पुरुष कर्मचारी त्याच्या दहशतीखाली वावरत असल्याने, आतापर्यंत त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे त्याचा छळ दिवसागणिक वाढत होता. अखेर निरंजन खंडारे याचा छळ असह्य झाल्याने, त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे लागले, असेही तक्रारीत नमूद आहे. या महिला कर्मचार्याच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४(अ) २९४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली.
म्हणे, आपली बॉडी सलमानसारखी!सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे हा माजी सैनिक आहे. तो कार्यालयात महिलांसमोर शर्टाची बटने उघडून आपली बॉडी सलमानसारखी आहे. आपण पहेलवान आहोत. आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही. असा नेहमीच बोलायचा.
पुरुष कर्मचार्याचाही छळसमाजकल्याण कार्यालयातील एका पुरुष लिपिकावर दबाव टाकून, त्याला धमक्या देऊन त्याच्याकडूनही निरंजन खंडारे हा कार्यालयातच मसाज करून घेतो. या लिपिकाला खंडारे हा सातत्याने दहशतीखाली ठेवून त्याचा छळ करायचा, असेही तक्रारीत म्हटले आहे.