अकोला शहरात दिवसा ‘जमावबंदी’ तर रात्री ‘संचारबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 06:30 PM2021-11-17T18:30:30+5:302021-11-17T18:30:42+5:30
Curfew in Akola : सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी तर सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी
अकोला : अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवार दि.१७ (दुपारी १२ वाजेपासून) ते शुक्रवार दि.१९ च्या सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्याचे आदेश (सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी तर सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी) उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.
यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवार दि.१७ (दुपारी १२ वाजेपासून) ते शुक्रवार दि.१९ च्या (सकाळी सहा वाजेपर्यंत) संपूर्ण अकोला शहरात सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी तर सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कालावधीत आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील, शासकीय कार्यालये अत्यावश्यक कामांसाठी सुरु राहतील. तसेच विधान परिषद निवडणूक संदर्भात नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरु राहिल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.