लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सध्या इयत्ता बारावीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी यादगिरे यांना सिंधी कॅम्पमधील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकलची परीक्षा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून नव्याने या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेण्यास बजावले आहे. बारावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने, सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका संगणकावर प्रॅक्टिकलची परीक्षा देणे अनिवार्य आहे. असे असतानाही काही महाविद्यालयांमध्ये एकाच संगणकावर तीन ते चार विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहेत. शनिवारी माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी शहरातील मेहरबानो कनिष्ठ महाविद्यालय, सुफ्फा कनिष्ठ महाविद्यालय, एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्याल आणि गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी दिल्या. यावेळी बोर्ड सचिव यादगिरे यांना सिंधी कॅम्प परिसरातील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर या ठिकाणी एकाच संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकलची परीक्षा देत असल्याचे दिसून आले. लगेच त्यांनी ही परीक्षा थांबविली आणि येथील विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची परीक्षा रद्द करून नव्याने एक संगणक एक विद्यार्थी यानुसार प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे बजावले. यासोबतच इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा झाल्यास, त्या रद्द करण्यात येतील, असा इशाराही यादगिरे यांनी दिला आहे.
शनिवारी शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालयात एकाच संगणकावर तीन विद्यार्थी प्रॅक्टिकल करताना दिसूत आले. त्यामुळे येथील परीक्षा थांबविली. नव्याने परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - संजय यादगिरेसचिव, माध्यमिक शिक्षण बोर्ड, अमरावती