अकोला: प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादच्यावतीने संगमनेर येथे घेण्यात आलेल्या माध्यमिक स्तरावरील इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेत अकोल्याच्या चमूने इंग्रजी अध्ययन पद्धतीचे उत्तम सादरीकरण करून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला.चेस प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यशाळेत शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा अध्ययनात आणि एकंदरीत इंग्रजी भाषा समृद्धीसाठी करण्यात आलेले प्रयत्न या विषयावर पेपर प्रझेंटेशन सादर करण्यात आले. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून करण्यात आलेल्या पेपर प्रेझेंटेशन सादरीकरणात अकोला जिल्ह्याचे सादरीकरण अव्वल राहिल्यामुळे जिल्ह्याच्या चमूला सर्वोत्तम सादरीकरणाचा पुरस्कार प्राप्त झाला. आगर येथील महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत लाहोळे, होलिक्रॉसच्या नीता आॅगस्टीन, इंग्लिश हायस्कूलचे चेस समन्वयक बहादूरसिंह चौहान यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यासोबतच तुकाराम विद्यालय पातूरच्या अलका चौहान (बैस) यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे योगेश पाचडे, सरस्वती विद्यालय कळंबीचे विनोद वाघमारे यांनी जिल्हा शो केसचे सादरीकरण केले. कार्यशाळेमध्ये इंग्रजी भाषा समृद्ध करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. त्यावेळी प्रकल्प संचालक रणजित देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यात चेस सुलभक म्हणून बहादूरसिंह चौहान, श्रीकांत लाहोळे, दीपक इंगोले (धनाबाई विद्यालय बाळापूर), गजानन बुडकले (स्वावलंबी विद्यालय), समाधान भालतिलक (बिहाडे विद्यालय वरूड बु.), प्रमोद राजंदेकर (शंकर विद्यालय कोळंबी) कार्यरत आहेत. या सर्वांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. समाधान डुकरे, इंग्रजी विभाग प्रमुख सागर तुपे, सहायक संदीप वरणकार यांचे मार्गदर्शन मिळाले. (प्रतिनिधी)