अकोला: मनपा उपायुक्त गगे यांची बदली; सहायक आयुक्तांवर भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:39 PM2020-07-08T12:39:25+5:302020-07-08T12:39:33+5:30
अवघ्या दोन महिन्यातच मनपाच्या एकमेव उपायुक्त रंजना गगे यांची सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
अकोला: ऐन कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाने एप्रिल महिन्यात मनपा उपायुक्त विजय कुमार म्हसाळ यांची ठाणे महापालिकेत बदली केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच मनपाच्या एकमेव उपायुक्त रंजना गगे यांची सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांचा बदली आदेश मंगळवारी मनपात धडकला, त्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांची सर्व भिस्त आता प्रभारी उपायुक्त वैभव आवारे, सहायक आयुक्त पुनम कळंबे यांच्यावर असल्याचे चित्र समोर आले आहे.
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. मार्च महिन्यात शहरात मोठ्या शहरांमधून दाखल होणाऱ्या नागरिकांची माहिती जमा करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये ७ एप्रिल रोजी आढळून आला आणि तेव्हापासून मनपाची यंत्रणा कार्यरत झाली. यादरम्यान प्रदीर्घ रजेवर असलेले मनपाचे तत्कालिन उपायुक्त विजय कुमार म्हसाळ यांची राज्य शासनाने ठाणे महापालिकेत बदली केली. यावेळी मनपाच्या एकमेव उपायुक्त रंजना गगे यांचा संथ कारभार लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस यांनी सहायक आयुक्त वैभव आवारे यांच्याकडे उप-आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविला. कोरोनाच्या संकटकाळात मनपाच्या प्रशासकीय कारभाराची धुरा सहायक आयुक्त वैभव आवारे यांनी यशस्वीरीत्या पेलल्याचे चित्र समोर आले आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने उपायुक्त रंजना गगे यांची सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली केल्यामुळे मनपाचा प्रशासकीय कारभार प्रभावित होण्याची शक्यता मनपाच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेत विविध कामांच्या नियमबाह्य देयकांसाठी शासनाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय पदाधिकाºयांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा महापालिका परिसरात आहे. त्यामुळे आणखी काही अधिकारी बदलीच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.