Akola Unlock : ७७५ दुकानांची तपासणी; ४० दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:36 AM2021-03-06T10:36:54+5:302021-03-06T10:37:01+5:30
Akola News काेराेना चाचणी अहवालाची पडताळणी करण्याच्या सबबीखाली मनपाच्या पथकांनी पहिल्याच दिवशी तब्बल ७७५ दुकानांची तपासणी केली.
अकाेला:जिल्हाप्रशासनाने शहरातील व्यावसायिकांना दुकाने खुली करण्याची परवानगी देताच महापालिका प्रशासनाने शुक्रवारी कारवाइचे हत्यार उपसले. दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या काेराेना चाचणी अहवालाची पडताळणी करण्याच्या सबबीखाली मनपाच्या पथकांनी पहिल्याच दिवशी तब्बल ७७५ दुकानांची तपासणी केली. चाचणी अहवाल उपलब्ध नसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ४० दुकानांना सील लावण्याची कारवाइ यावेळी करण्यात आली. दरम्यान,कारवाइ तिव्र करण्यासाठी मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांनी आणखी २० पथकांचे गठन केले आहे.
जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा प्रादूर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. यामुळे शासकीय तसेच वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गतवर्षी काेराेनामुळे सर्व उद्याेग व्यवसाय ठप्प झाले हाेते. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्यामुळे बेराेजगारीचा प्रश्न निर्माण झाला. शासनाने टाळेबंदी शिथील केल्यामुळे पुन्हा एकदा उद्याेग व्यवसाय सुरु झाले. मागील काही दिवसांपासून काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून जिल्हाप्रशासनाने ८ मार्च पर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, निर्धारित वेळेत व्यापार सुरु करण्याची मुभा देण्याचा रेटा व्यापाऱ्यांनी लावून धरल्यानंतर जिल्हाप्रशासनाने ५ मार्च पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. त्यासाठी व्यापारी व दुकानांमधील कामगारांची काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच मनपा,महसूल व पाेलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाइचा बडगा उगारला. काेराेना चाचणीचा अहवाल नसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ४० दुकानांना सील लावण्याची कारवाइ करण्यात आली.
अशी केली झाेन निहाय कारवाइ
मनपाने गठीत केलेल्या पथकांनी पूर्व झाेनमध्ये ३५० दुकानांची तपासणी केली. पश्चिम झाेनमध्ये ३० दुकानांची तपासणी करीत दाेन दुकानांना सील लावले. उत्तर झाेनमध्ये २६० दुकानांची तपासणी करून ३५ दुकानांना सील लावण्यात आले. दक्षिण झाेनअंतर्गत १३५ दुकानांची तपासणी करीत तीन दुकानांना सील लावले आहे.