हजारो सभासदांना अंधारात ठेवून अकोला अर्बन बँकेची निवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:24 PM2019-12-21T12:24:35+5:302019-12-21T12:24:40+5:30
बँकेच्या ९८८५८ सभासदांपैकी सत्तर टक्के सभासदांना, निवडणूक कार्यक्रमाबाबत माहितीदेखील नाही.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हजारो सभासदांना अंधारात ठेवून दि. अकोला अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या १७ संचालक पदांसाठी आगामी ५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक घेतली जात आहे. बँकेच्या ९८८५८ सभासदांपैकी सत्तर टक्के सभासदांना, निवडणूक कार्यक्रमाबाबत माहितीदेखील नाही. त्यामुळे अकोला अर्बन बँकेची आगामी निवडणूक वादात सापडण्याची शक्यता आहे.
अकोला अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने सुरू असून, बँकेची सभासद यादी तपासण्यात यावी, असा आक्षेप बँकेचे सभासद पुरुषोत्तम व्यास, अमर कटारिया यांनी केंद्रीय निबंधकांकडे आणि सोबतच अकोल्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे दाखल केला. बँकेच्या सभासद यादीत अनेक सभासद मयत आहेत. सोबतच खंडवा आणि इंदूर येथील सभासदांची यादी संशयास्पद असून, यादी अद्ययावत केलेली नाही. अशा आशयाची तक्रार व्यास यांची आहे. त्यावरील सुनावणी २१ डिसेंबर २०१९ रोजी ठेवलेली असताना बँकेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमाची गोपनीयतादेखील बाळगली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कदम यांची नियुक्ती १६ आॅगस्ट २०१९ रोजी झालेली असतानादेखील निवडणूक कार्यक्रम उशिराने जाहीर झाला आहे. सर्वसाधारण संचालक पदासाठी ९, शाखा प्रतिनिधींसाठी ४, मागासवर्गीयांसाठी १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ आणि महिला प्रतिनिधींसाठी २ अशा एकूण १७ संचालक पदांसाठी ५ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे. १९ आणि २० डिसेंबर रोजी नामनिर्देश अर्ज दाखल करणे, २१ डिसेंबर रोजी छाननी, २३ ला अर्ज मागे घेणे, २६ ला अंतिम यादी आणि ५ जानेवारी रोजी निवडणूक असा कार्यक्रम आहे. अकोला जिल्ह्यासह कारंजा, मंगरूळपीर, नागपूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, दर्यापूर, मुंबई, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद व नाशिक येथे मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
बँकेच्या सभासद यादीवर आक्षेप घेणारा अर्ज बँकेचे सभासद पुरुषोत्तम व्यास यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केला आहे. त्या सुनावणीत यादीसंदर्भात बाजू ठेवली जाणार आहे.
-संजय कदम,
निवडणूक निर्णय अधिकारी
बँकेच्या सर्व सभासदांना ११ डिसेंबर २०१९ रोजी पोस्टाद्वारे निवडणूक कार्यक्रमाची सूचना पाठविण्यात आली आहे. काहींना मिळाली नसेल. आम्ही यासंदर्भात एक वृत्तपत्रात निवडणूक कार्यक्रम प्रसारित केलेला आहे.
- सुभाष शर्मा,
उपमुख्य कार्यपालन अधिकारी