शिर्ला/पातूर : अकोला-नांदेड तथा हैदराबाद -मुंबई अशा अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अकोला-वाशिम जिल्ह्याच्या पातूर सीमेवरील वाहतूक मंदावली असून, वाहनांचे आवागमन कमी झाले आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सलग तिसऱ्या दिवशी पातुरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने रस्त्यांवर फिरण्यास कोणीच धजावत नसल्याचे चित्र आहे.सोमवार मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केल्यानंतर पातूर शहरात कमालीची स्मशान शांतता पसरली असून, सर्वत्र रस्ते ओस पडले आहेत. अत्यावश्यक सेवांमधील भाजीपाला, दवाखाना, मेडिकल, दूध डेअरी, पीठगिरणी, गॅस एजन्सी वगळता बाजारपेठेतील आणि शहरातील सर्वच दुकाने बंद होती. तहसीलदार दीपक बाजड, सय्यद एहसानोद्दीन, पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश नावकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मध्यरात्री शासनाने जिल्हा सीमा बंदी केल्यानंतर रात्रीपासूनच पातूर पोलिसांनी तेथे बंदोबस्त लावला आहे. दुपारनंतर वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. मंगळवारी सकाळी अकोला-पातूर दरम्यान महामार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ दिसून आली. पातूर शहरात संचारबंदी असल्याने सातत्याने पोलीस गस्त घालताना दिसत आहेत. संचारबंदीमध्ये नागरिकही घरातच थांबलेले आहेत.