लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणार्या डॉक्टरांच्या उपस्थितीवर आता प्रशासकीय ‘वॉच’ राहणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने ‘बायोमेट्रिक’ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. अधिष्ठातांपासून सफाई कामगारापर्यंत सर्वच कर्मचारी या प्रणालीच्या कक्षेत येणार असल्यामुळे त्यांची ‘जीएमसी’मधील उपस्थितीचे प्रमाण सुधारण्यास मदत मिळणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या जिल्हय़ांमधूनही रुग्ण उपचारासाठी येतात. येथील बाहय़ उपचार विभागात (ओपीडी) दररोज किमान १८00 ते २000 रुग्णांची तपासणी होते. तसेच या रुग्णालयात भरती होणार्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. रुग्ण संख्या मोठी असली, तरी येथील कर्मचार्यांची संख्या त्या तुलनेत तोकडी आहे. रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नेहमीच असतात. यावर उपाय म्हणून महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या डॉक्टरांपासून ते सफाई कामगारांपर्यंतच्या सर्वच कर्मचार्यांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील नोंदीची सांगड कर्मचार्यांच्या वेतनाशी घालण्यात येणार आहे. ही प्रणाली बसविण्यासाठी आवश्यक असलेले वाय-फाय राऊटर व इतर सामग्रीसाठी निविदा बोलाविण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या बाबींची पूर्तता होऊन ‘जीएमसी’मध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे. अधिष्ठातापासून सफाई कामगारापर्यंतच्या सर्वच कर्मचार्यांना या मशीनमध्ये ‘थम्ब इम्प्रेशन’ करणे बंधनकारक असणार आहे.
‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांसाठीही करणार अनिवार्यपहिल्या टप्प्यात कर्मचार्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू केल्यानंतर, लवकरच दुसर्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांनाही ही प्रणाली अनिवार्य करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक मशीन व सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचा तासिकांना हजर राहण्याचा टक्का फारसा समाधानकारक नसल्यामुळे ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, लवकरच तिचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढीस लागून, कर्मचार्यांची ‘जीएमसी’मधील उपस्थिती सुधारण्यासाठीही मदत होणार आहे. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.