अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांचे पीए तथा जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेला चंद्रशेखर रायभान गवई याच्याविरुद्ध 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गवईला कारवाईचा संशय आल्याने लाच घेणे टाळून तो जिल्हा परिषदेतून फरार झाला.
जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते. निलंबित शिक्षकाचा निलंबन कालावधी नियमित करून,पगार थकबाकी काढणेसाठी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याकरीता चंद्रशेखर रायभान गवई याने 25 हजार रुपयांची लाच सदर शिक्षकाकडे मागितली. मात्र शिक्षकाला लाच देणे शक्य नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 23 एप्रिल रोजी साक्षीदार व पंचासमोर पडताळणी केली असता चंद्रशेखर गवई याने शिक्षकाला लाच मागितल्याने सिद्ध झाले.
अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपी गवईच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. लाचखोर गवईला गुरुवारी अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी जिल्हा परिषदेत पोहचले दरम्यान कारवाईचा संशय आल्याने गवई फरार झाला. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले, पोहवा दामोदर,सुनील राऊत,संतोष दहीहंडी, राहुल इंगळे, सुनील येलोने यांनी केली.