अकोला जिल्हा परिषदेत अडकली स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र विकासाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 10:58 AM2021-01-05T10:58:49+5:302021-01-05T11:02:36+5:30
Akola ZP News जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील स्मशानभूमी व तीर्थक्षेत्र विकासाची कामे अडकल्याचे वास्तव आहे.
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात प्रस्तावित स्मशानभूमी व तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी सात कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर असला तरी, कामांचे प्रस्ताव जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील स्मशानभूमी व तीर्थक्षेत्र विकासाची कामे अडकल्याचे वास्तव आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील स्मशानभूमी विकास तसेच तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी सात कोटी ३० लाख रुपयांची निधी मंजूर आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतनिहाय स्मशानभूमी विकासकामे तसेच तीर्थक्षेत्र विकासकामांचे प्रस्ताव मागविण्यात आले. परंतु जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून स्मशानभूमी विकासकामांसह तीर्थक्षेत्र विकासकामांचे प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमी व तीर्थक्षेत्र विकासकामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यानुषंगाने प्रस्तावांअभावी जिल्हा परिषदेत अडकलेली जिल्ह्यातील स्मशानभूमी व तीर्थक्षेत्र विकासाची कामे मार्गी लागणार तरी केव्हा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रस्तावित कामे अशी आहेत
स्मशानभूमी विकास : ५ .०० कोटी
तीर्थक्षेत्र विकास : २.३० कोटी
......................................................
एकूण : ७.३० कोटी