अकोला: जिल्हा परिषदेच्या एका गटाच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि एका गटाच्या आरक्षणावर असे दोन आक्षेप सोमवार, ६ मेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. तर मूर्तिजापूर पंचायत समिती गणांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) महिला आरक्षणासंदर्भात एक आक्षेप दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसाठी आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण आणि या सर्व प्रवर्गातील महिलांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीवर आक्षेप दाखल करण्याची मुदत ६ मे पर्यंत होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या हिवरखेड गटाच्या प्रभाग रचनासंदर्भात हिवरखेड येथील सुनील अस्वार यांनी तसेच अकोली जहागीर गटाच्या आरक्षणासंदर्भात तेल्हारा येथील उमेश पवार यांनी आक्षेप दाखल केला आहे. तसेच मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गणांसाठी नामाप्र महिला आरक्षणासंदर्भात मूर्तिजापूर येथील उत्तमराव लांडे यांनी आक्षेप दाखल केला आहे. ६ मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आलेल्या या आक्षेपांवर १० मे रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे.