अकोला : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि दोन सभापतींच्या विषय समित्यांचे खातेवाटप मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये उपाध्यक्ष सावित्री राठोड यांना आरोग्य व अर्थ, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना शिक्षण व बांधकाम आणि सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपद देण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर समाजकल्याण, महिला व बालकल्याण सभापतींसह विषय समित्यांच्या दोन सभापतींची ३० जानेवारी रोजी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये समाजकल्याण सभापती म्हणून आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा बोर्डे आणि विषय समित्यांचे सभापती म्हणून चंद्रशेखर पांडे गुरुजी व पंजाबराव वडाळ यांची निवड करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षांसह विषय समित्यांच्या दोन सभापतींना प्रत्येकी दोन खात्यांच्या समित्यांचे सभापतीपद देण्यासाठी ११ फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे आरोग्य व अर्थ, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे शिक्षण व बांधकाम आणि सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या समितीचे सभापतीपद देण्यात देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी जाहीर केले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, सभापती पंजाबराव वडाळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.दहा विषय समित्यांवर सदस्यांची निवडही अविरोध!सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या विविध १० विषय समित्यांवर सदस्यांची निवडही अविरोध करण्यात आली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या सहमतीने जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांवर ८३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये स्थायी समिती-८, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती -६, कृषी समिती -१०, समाजकल्याण समिती-११, शिक्षण व क्रीडा समिती -८, बांधकाम समिती -८, आरोग्य समिती-८, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती -८, महिला व बालकल्याण समिती -८ आणि अर्थ समितीवर ८ सदस्यांची निवड करण्यात आली.
जि.प. उपाध्यक्षांना आरोग्य-अर्थ; पांडे गुरुजींकडे शिक्षण-बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:53 PM