अकोला : जिल्हा परिषदेत ३ डी गव्हर्नन्स प्रकल्पानुसार कार्यपद्धती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळासोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाची लवकरच अंमलबजावणी सुरू होत असून, त्यासाठीची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयाच्या कामकाजाची ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसेड्युर’(एसओपी) ठरणार आहे. या प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे विवेक सावंत, समीर पांडे, विनायक कदम उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेसाठी नियोजित ‘३ डी गव्हर्नन्स’ प्रकल्पाबाबत चर्चा झाली. प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर कराव्या लागणाºया उपाययोजनांसाठी माहिती गोळा करण्याला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्रिस्तरीय यंत्रणेच्या संस्थात्मक रचनेची तपशीलवार माहिती, प्रत्येक अधिकारी-कर्मचारी सेवापुस्तिकेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे करीत असलेले कामकाज, त्याच्याकडे असलेल्या जबाबदाºया, त्या कशा पार पाडल्या जातात, कामाचे वर्क फ्लो कसा आहे, त्यासाठी ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसेड्युर’ वापरली जाते का, कामे पार पाडण्यासाठी कोणते शासकीय निर्णय, परिपत्रकांचा आधार घेतात, याची तपशीलवार माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेत येणाºया आवकचा ‘स्टडी रिपोर्ट’ घेण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषत: नागरिक जिल्हा परिषदेकडून कोणती सेवा मागतात, याचेही विश्लेषण केले जाणार आहे. या माहितीचे अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे पथक लवकरच जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.
अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज ‘एसओपी’ने चालणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 2:44 PM