- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: फुटबॉलचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या अकोला जिल्ह्याला नव्या उमेदीचा खेळाडू गवसला आहे. देशाच्या फुटबॉल क्षेत्रात नावाजलेल्या शेख घराण्यातील चौथ्या पिढीतील हा खेळाडू. या खेळाडूचे नाव सुफीयान शेख. १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत इंडोनेशिया येथे आयोजित आशियाई फुटबॉल स्पर्धेत सुफीयान १८ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय संघात सुफीयान महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे, हे येथे उल्लेखनीय.सुफीयान १६ वर्षांचा आहे. सुफीयानचे आजोबा शेख चांद हे अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी खेळाडू आहेत. वडील फईम शेख महाराष्ट्र पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. सुफीयानला बालपणापासून फुटबॉलचे वेड आहे. अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर सुफीयान खेळायचा. अलीकडे सुफीयानने राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत स्वर्णिम कामगिरी केली. अनेक चषक आणि अनेक पदके महाराष्ट्राच्या झोळीत सुफीयानने टाकली. सुफीयान सध्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे शिक्षण घेत आहे. तसेच कोल्हापूर पोलीस दल १७ वर्षांखालील संघाचेदेखील अनेक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सुफीयानचा फुटबॉल आलेख उंचावत आहे. आजोबा शेख चांद, विदर्भ केसरी नजीर पहिलवान, वडील अब्दुल फईम, क्रीडा संघटक सय्यद जावेद अली यांचे मार्गदर्शन सुफीयानला लाभत असते.स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरसिहोर (मध्य प्रदेश) येथे १८ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे २१ दिवसीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरामध्ये देशभरातील ४० खेळाडू सहभागी झाले होते. यामधून २० खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली. मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ इंडोनेशियाला रवाना झाला. भोपाळ येथे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कमलनाथ यांनी सुफीयानचे कौतुक केले.
भारतीय संघशिक्कू सुनील केरळ, आयुष जेना दिल्ली, अरुण बामुमैट्री आसाम, राहान ब्रम्हा आसाम, संजय भुमीज आसाम, पलाश बाइबर राजस्थान, ईश्वर कुमार उत्तराखंड, अंशुमन तोमर दिल्ली, रानशीर सिंह दिल्ली, जयरू बिन तामिळनाडू, केदार जाट राजस्थान, भरत मेहरा उत्तराखंड, मो. मुस्तफा खान उत्तर प्रदेश, निखिल शर्मा राजस्थान, राहुल हरियाणा, अब्दुल सुफियान शेख महाराष्ट्र, लेमपोकपैम नोबा सिंह मणीपूर, बापी रैप्टन छत्तीसगड, विकास पांडे मध्य प्रदेश, सुयश कनोजिया मध्य प्रदेश.