अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:30 AM2018-01-19T01:30:19+5:302018-01-19T01:30:31+5:30
अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान ग्रामस्थांनी कुर्हाडी, विळे, काचकुर्या व लोखंडी गज याने वन कर्मचार्यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागाच्या क्षेत्रातील ८ गावांचे अतिसंरक्षित वनक्षेत्रातून अभयारण्याबाहेर पुनर्वसन झाले आहे. या ग्रामस्थांनी अवैधरीत्या २५ डिसेंबर रोजी पुन्हा मूळ गावात प्रवेश केला असून, हे ग्रामस्थ अवैध कृत्य करीत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. दरम्यान पाणवठय़ातील पाण्यामध्ये विष टाकल्यामुळे गव्याचा मृत्यू झाला. हे कृत्य पुनर्वसित गावात परतलेल्या ग्रामस्थांनीच केल्याचा संशय असल्यावरून उपवनसंक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक व २00 वन कर्मचार्यांनी ग्रामस्थांच्या रहिवासी परिसराची तपासणी करण्यासाठी पुनर्वसन झालेल्या धारगड, गुल्लरघाट, बारुखेडा, नगरतास या गावात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी अधिकार्यांवर ग्रामस्थांनी हल्ला केला मात्र तो परतून लावत वनाधिकार्यांनी ग्रामस्थांच्या घरातून ३५ कुर्हाडी, ३५ विळे व लोखंडी गज जप्त करण्यात आले आहे. दरम्यान वनविभागाने ही कारवाई आकासा पोटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात उपवनसरंक्षक जी. गुरूप्रसाद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
आमच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. विळा, कुर्हाड, हे घरीच असते त्याचा वापर प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आम्ही करत नाही. आमच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू असून तो दडपण्याकरीता वनविभाग ग्रामस्थांवर खोटे आरोप लावत आहे.
-विष्णू राऊत,
पुनर्वसित ग्रामस्थ प्रतिनिधी