प्राणीमात्रांच्या जिवासाठी रुग्णवाहिकेची सोय, वर्षभरात ३०० पशूंवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 10:12 AM2017-08-20T10:12:48+5:302017-08-20T10:13:11+5:30
आजच्या आधुनिक युगात मानव इतरांच्या भावना समजून घेण्यासही मागेपुढे पाहत असताना शिरपूरच्या अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानने मात्र चक्क प्राणीमांत्रांच्या दुख:ाची जाण ठेवली आहे.
शंकर वाघ / ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन, दि. 20 : आजच्या आधुनिक युगात मानव इतरांच्या भावना समजून घेण्यासही मागेपुढे पाहत असताना शिरपूरच्या अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानने मात्र चक्क प्राणीमांत्रांच्या दुख:ाची जाण ठेवली आहे. यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी पशू रुग्णवाहिकेची संकल्पना अस्तित्वात आणली असून, या रुग्णवाहिकेचा जिल्ह्यातील शेकडो पशूपालकांना मोठाच आधार झाला आहे.
माणूस आजच्या धकाधकीच्या जिवनात नातेसंबंध जोपासण्यासाठीही खूप विचार करतात. स्वाथार्ने बरबटलेल्या या युगात आप्तस्वकीयांकडूनच अनेकांचा घात झाला आहे. अनेक जण उपचाराअभावी प्राणाला मुकले आहेत. थकलेले हजारो वृद्ध आजही आपल्या मुलाबाळांकडून उपेक्षीत आहेत. दुसरीकडे शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानने मात्र अतिशय चांगला आणि मानवाच्या संवेदना जागृत करणारा अभिनव उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला आहे. आजारी आणि दुखापतग्रस्त पाळीवर पशूंवर वेळेवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविता या यावेत, या उद्दात हेतूने शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्यावतीने निशुल्क पशू रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही गावातील पशूपालकाने रुग्णवाहिका सेवेसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तात्काळ ही रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचते आणि तेथून आजारी किंवा दुखापतग्रस्त पशूला पशू दवाखान्यापर्यंत पोहोचविते. तेथे उपचार पूर्ण झाल्यानंतर ही रुग्णवाहिका पुन्हा पशूला पूर्वीच्या अर्थात पशूपालकाच्या घरी नेऊन पोहोचविते. यासाठी त्यांच्याकडून एक पैसाही शुल्क म्हणून स्वीकारला जात नाही.
जैन मुनींच्या महान विचारांमुळे मिळाली प्रेरणा
जैन धमार्ता अहिंसेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या विचारांची जोपासना, प्रचार आणि प्रसार जैन मुनींच्यावतीने सतत करण्यात येते. याला अनुसरुन प.पु. गुरुदेव श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांच्या प्रेरणेतूनत्यांचे परमशीष्य पन्यासप्रवर गुरुदेव श्री विमलहंस विजयजी, तसेच परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्यावतीने ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे.
वर्षभरात वाचले ३०० पशूंचे प्राण
अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने पशूंवर उपचारासाठी सुरू करण्यात आलेला रुग्णवाहिकेचा उपक्रम वर्षभराच्या कालावधित शेकडो पशू पालकांसह त्यांच्या पशूंसाठी मोठा लाभदायक ठरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही रुग्णवाहिका पशूंची जीववाहिनी म्हणून ओळख निर्माण झाली आणि या वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणच्या तब्बल ३०० रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे हाड मोडलेल्या पशूंवरही प्रभावी उपचार पद्धतीचा अवलंब करणे शक्य झाले असून, मानवाप्रमाणेच पशूंच्या मोडलेल्या हाडांवरही प्लास्टर बांधणे यामुळे शक्य झाले आहे. केवळ उपचारच नव्हे, तर मानवाप्रमाणेच पशूंवरही अंतिम संस्कार करता यावेत म्हणूनही या रुग्णवाहिकेचा वापर संस्थानच्यावतीने करण्यात येतो.
राज्यातील हायड्रोलिक तंत्रज्ञानयुक्त एकमेव रुग्णवाहिका
शिरपूर येथील पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने सुरू करण्यात आलेली ही रुग्णवाहिका हायड्रोलिक तंत्रज्ञानयुक्त असल्यामुळे पशूंना रुग्णवाहिकेते चढविणे फारसे कठीण जात नाही. हायड्रोलिक तंत्रज्ञान असलेली महाराष्ट्रातील ही एकमेव पशू रुग्णवाहिका आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे दिनेश मुथा आणि किशोर खंडेलवाल हे या रुग्णवाहिकेचे काम पाहतात. हाड मोडलेल्या आणि आजाराने क्षीण झालेल्या पशूंसाठी हे वरदानच ठरत आहे.
जैन मुनींचे महान विचार आणि प.पु. श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशीष्य पन्यासप्रवर गुरुदेव श्री विमलहंस विजयजी महाराज तसेच परमहंस श्री विजयजी महाराज यांच्या प्रेरणेतून ही पशू रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. आजरी माणसावर उपचारासाठी रुग्णवाहिका किंवा इतर पर्याय सहज उपलब्ध होऊ शकतात; परंतु पशूंसाठी अशी व्यवस्था नाही. त्यामुळेच महाराजांची संकल्पना आणि प्रेरणेतून ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे ३०० पशूंचे प्राण वाचविणे शक्य झाली आहे.
-किशोर खंडेलवाल