ऐन वेळेवर परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांची रात्र रेल्वे स्थानकावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:23+5:302021-09-25T04:19:23+5:30
अकोला : आरोग्य विभागाची परीक्षा ऐन वेळेवर पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ...
अकोला : आरोग्य विभागाची परीक्षा ऐन वेळेवर पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची शनिवारी व रविवारी आयोजित लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागला. शनिवारी परीक्षा असल्याने अनेकांनी अकोला गाठले होते. परीक्षा रद्द झाल्याचे समजताच रात्री उशिरा घरी परतण्यास मार्ग नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी रात्र रेल्वेस्थानकावरच काढल्याचे शुक्रवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास लोकमतने पाहणी केली असता दिसून आले.
आरोग्य विभागाची परीक्षेसाठी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट आदी परीक्षा केंद्र असल्याने राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अकोला गाठले होते. तब्बल ३०० ते ४०० कि.मी.चा प्रवास करून अकोला येथे पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलींचाही सहभाग होता. अनेकांना वेळेवर लॉज, रूम उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानकावर रात्र काढावी लागली. रात्री ११ ते१२ वाजताच्या सुमारास पाहणी केली असता रेल्वे स्थानक, बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे समूह गट दिसून येत होते.
-----------------------------------------
विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना
मी वाशीम येथून एक हजार रुपये खर्चून आलो आहे. ऐन वेळेवर परीक्षा रद्द झाल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत सरकारने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या खर्चाची भरपाई द्यावी.
- नंदकिशोर हजारे, रा. अडगाव, ता. जि. वाशिम.
------------------------
परीक्षेला काही तासच उरलेले असताना परीक्षा रद्द करणे चुकीचे आहे. राहण्याची व जेवण्याची व्यवस्था नाही. आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागला. सरकारचा हा निव्वळ हलगर्जीपणा आहे.
- राम काळबांडे, रा. कोथळगाव, वाशिम.
-----------
एक ते दोन दिवसांपूर्वी परीक्षा रद्द झाली असती, तर चालली असती. ऐन वेळेवर परीक्षा रद्द होणे म्हणजे विद्यार्थ्यांचा अंत पाहणे होय. मी नागपूर येथून अकोल्यात परीक्षेसाठी आली आहे. पर्याय नसल्याने रात्र रेल्वेस्थानकावर काढावी लागत आहे.
- संध्या बोपचे, नागपूर.
---------------
मी परीक्षेसाठी नागपूर येथे आली आहे. आघाडी सरकारने आश्वासन देऊन वेळेवर परीक्षा रद्द केली. परीक्षा ही विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देण्यासाठीच रद्द केल्याचे समजते. विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.
-पूजा अमोल शिरसाट, रा. सांगळूद बु.
-----------------------------
पैसे गेले, वेळही गेला. परीक्षेसाठी अकोल्यात आल्यानंतर रद्द झाल्याने राहण्याचा खर्च वाया गेला आहे. सरकारने त्वरित विद्यार्थ्यांना मदत करावी.
- नवनाथ कांदे, रा. सोनपेठ, जि. परभणी.
---------------------
ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याने ही वेळ आली आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आरोग्य मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
-नितीन अडकिने, रा. वसमत, जि. हिंगोली.
-------------------------------
‘वंचित’ आली धावून
अकोल्यातील विद्यार्थ्यांना बाहेरगावचे सेंटर असल्याने वंचितचे कार्यकर्ते पराग गवई हे विद्यार्थ्यांना सोडून देण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर आले होते. परीक्षा रद्द झाल्याचे समजताच ते परतत असताना अनेक विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था नसल्याचे त्यांना समजले. त्यावेळी पराग गवई व संकेत सिरसाट यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींची जेवण, नास्त्याची व्यवस्था केली होती.