अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, गुरुवार, १४ जानेवारी रोजी आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ११,०४० वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, सहकार नगर, चिंतामणी नगर व जुने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर येथील दोन, तर कौलखेड, अकोट, शिवर, सराफा बाजार, जुने खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, जठारपेठ व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,०४० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.