Corona vaccine लसीकरणावेळी चालेल कुठलेही ओळखपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 10:58 AM2021-01-10T10:58:32+5:302021-01-10T11:00:37+5:30
Corona vaccine लसीकरणावेळी कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचे प्र. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.
अकोला : जिल्ह्यात लवकरच कोविड लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्ह्यातील चार केंद्रांवर कोविड लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली, परंतु या वेळी लाभार्थ्यांमध्ये ओळखपत्राविषयी संभ्रमाची स्थिती दिसून आली. या संदर्भात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, लसीकरणावेळी कुठलेही ओळखपत्र चालणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कोविडच्या दोन लसींना शासनाने मान्यता दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष कोविड लसीकरणाकडे लागले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात लसीकरणाची पूर्वतयारीही करण्यात आली असून, शुक्रवारी लसीकरणाची यशस्वी रंगीत तालीम करण्यात आली. दरम्यान, ओळखपत्र कोणते द्यावे यासंदर्भात अनेकांमध्ये संभ्रम दिसून आला. कोविड लसीसाठी लाभार्थी म्हणून नोंदणी करताना काही कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड दिले होते, मात्र रंगीत तालमीवेळी आधार कार्ड दिल्याने ते ओळखपत्र म्हणून स्वीकारावे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात प्र. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांना विचारणा केली असता, लसीकरणावेळी कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओळखपत्र म्हणून होतोय पॅनकार्डचाही वापर
पॅनकार्ड हे प्रामुख्याने कर प्रणालीशी निगडित असून, त्याचा ओळखपत्र म्हणून उपयोग केला जाऊ शकत नाही. मात्र, अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जात आहे. कोविड लसीकरणावेळी पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून उपयोग कितपत योग्य आहे, याबाबतही संभ्रमाची स्थिती आहे.
कोविड लसीकरणासाठी येताना लाभार्थ्यांनी इलेक्शन कार्ड, आधारकार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र आणल्यास हरकत नाही. लसीकरण केंद्रावर संबंधित ओळखपत्राची माहिती सिस्टीममध्ये अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, प्र. आरोग्य उपसंचालक, अकोला