अकाेला : शहराचा विकास आराखडा (डीपी-डेव्हलपमेंट प्लान)तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. ‘डीपी’तयार हाेत असताना प्रत्यक्ष जमिन वापर नकाशा (एक्जिस्टींग लॅन्ड यूज) तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून हा नकाशा मनपाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, या नकाशात अकाेलेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी प्रशासनाने प्रभाग निहाय बैठकांचे आयाेजन केले असता,नागरिकांनी पाठ फिरविल्याचे समाेर आले.
शहराचा विकास आराखडा तयार करणाऱ्या उपसंचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक कार्यालयाच्यावतीने विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करुन २१ मार्च २०२३ राेजी नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. हा नकाशा नागरिकांच्या अवलाेकनार्थ व लेखी सूचनेसाठी २७ मार्च ते २० एप्रिल पर्यंत मनपात उपलब्ध करुन देण्यात आला हाेता. यादरम्यान, उपसंचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक कार्यालयाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांच्या सूचनांचा समावेश करण्यासाठी २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत प्रभाग निहाय बैठकांचे आयाेजन केले. या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या प्रभागात किंवा शहरात नेमक्या काेणत्या साेयी,सुविधांचा अंतर्भाव करावा, याबाबत सूचना मांडणे अपेक्षित असताना या बैठकांकडे अकाेलेकरांनी सपशेल पाठ फिरवल्याचे समाेर आले.
चार-पाच नागरिक, माजी नगरसेवकांची हजेरीशहराचा विकास आराखडा (डेव्हलमेंट प्लान) तयार करण्यासाठी शासनाने उपसंचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक कार्यालयाचे गठन केले. या कार्यालयाने शहरातील २० प्रभागांमध्ये बैठकीचे आयाेजन केले असता, बाेटावर माेजण्याइतपत चार-पाच नागरिक व माजी नगरसेवकांनी हजेरी लावली.