अकोला जिल्ह्यात दोन ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:27 AM2020-09-16T10:27:04+5:302020-09-16T10:27:24+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत दोन आॅक्सिजन प्लांटसाठी मंजुरी दिली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात शेकडो रुग्णांची भर पडत आहे. आॅक्सिजनची कमतरता हे कोरोना रुग्णामधील एक प्रमुख लक्षण आहे. यासाठी जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुरेसा आॅक्सिजनचा साठा असावा म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत दोन आॅक्सिजन प्लांटसाठी मंजुरी दिली आहे.
सदर आॅक्सिजन प्लांटसाठी ४७ लक्ष ९९ हजार इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी एक प्रमाणे दोन आॅक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. लिक्वीड मेडिकल आॅक्सिजन १० किलोलीटर अशी आॅक्सिजन टँकची क्षमता राहणार आहे. यामुळे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात आॅक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आॅक्सिजनची मागणी पूर्ण होणार असून, त्यामुळे आॅक्सिजनी आवश्यकता असणाऱ्या अतिगंभीर स्थितीतील रग्णांना लाभ होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.