कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता एसटी प्रशासनाला लागली होती. जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एसटी बस सुरू करण्यात आल्या. प्रमुख मार्गावर बस धावत असल्याने प्रवासी भाड्यातून उत्पन्न हाती येत आहे. एसटीचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यातील आगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गळक्या एसटी बस डोकेदुखी ठरत आहेत. आगार क्रमांक १ व २ मधील काही बस पावसात गळत आहेत. टपावरून पाणी थेट आतमध्ये येत असल्याने प्रवासी चिंब होत आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच व चांगली बस बघूनच प्रवासी बसमध्ये चढत आहेत.
बसला वेदर स्ट्रीप
पावसाळ्याच्या दिवसात एसटी महामंडळाच्या बसच्या छतामधून किंवा खिडकीतून पाणी गळू नये, याकरिता प्रत्येक बसला वेदर स्ट्रीप लावण्यात येते. अकोला विभागातील किती बसला या स्ट्रीप लावण्यात आल्या याबाबत माहिती मिळू शकली नाही.
एसटीचा कसरतीचा प्रवास
काही लांब पल्ल्याच्या बस ग्रामीण भागातून जातात. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र, खिळखिळ्या बस सोडल्या जात असल्याने पावसाच्या पाण्याने गळत आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
- जीवन इंगळे
लालपरीचे ग्रामीण भागातील प्रवाशांना आजही आकर्षण आहे. याच लालपरीचा ग्रामीण प्रवाशांना माेठा आधार आहे. मात्र, माेडकळीला आलेल्या, गळणाऱ्या बसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
- विजय भिसे
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला; पण पैसा नाही!
काेराेना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश बस जाग्यावरच थांबून आहेत. अशावेळी बसचा मेंटनन्सचा खर्च वाढला आहे. अनेक भंगारातील बस दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा निधी नाही.
मात्र, डिझेलचा तुटवडा नसला तरी इंधनाचे दर वाढल्याने माेठी कसरत करून अकोला विभागाला प्रवासी सेवा द्यावी लागत आहे; पण अकोला आगाराला डिझेलअभावी एकही बस उभी ठेवावी लागली नाही.
नादुरुस्त बस, गळणाऱ्या बस आणि आसनव्यवस्था दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आर्थिक घडी अद्यापही बसलेली नाही. अशा स्थितीत आवश्यक बाबींवरच निधी खर्च केला जात आहे.