कोरोना रुग्णांसाठी आणखी २०० खाटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:36 AM2020-09-14T10:36:03+5:302020-09-14T10:36:10+5:30
आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत प्रत्येकी १०० - १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वसामान्यांचा आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावरचा भार हलका करण्याच्या उद्देशाने कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आणखी २०० खाटा लवकरच उपलब्ध होणार आहेत. राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत प्रत्येकी १०० - १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
कोरोनाच्या रुग्णांसाठी तालुकास्तरावरही व्यवस्था असली, तरी बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात येत आहेत. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यावर रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा रुग्णांना आता थेट आॅक्सिजन सुविधा असलेल्या खाटा द्याव्या लागत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील सर्व ४५० खाटा व्यस्त आहेत. कोविड सेंटर्समध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा असल्या तरी मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आता खाटाच शिल्लक नसल्याचे वास्तव आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सरसावला असून, येत्या आठवडाभरात अकोला शहरातील राधाकिशन तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयात १०० खाटांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उघडण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच रुग्ण शुश्रूषा सुरू होणार आहे. याशिवाय जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीतही पहिल्या टप्प्यात ५० खाटांचे कोविड सेंटरचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांनी ठेवला आहे. त्यानंतर दुसºया टप्प्यात आणखी ५० खाटांचे कोविड सेंटर होणार आहे. या दोन्ही ठिकाणी मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.
कंत्राटी तत्त्वावर घेणार मनुष्यबळ
नव्याने होणार असलेल्या या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने कंत्राटी तत्त्वावर कुशल मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पदभरतीसाठी जाहिरात काढण्यात आली असून, सोमवारपासून मुलाखती सुरू होणार आहेत.
‘सर्वोपचार’चा भार कमी होणार
जिल्हाभरातील मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना सध्या सर्वोपचार रुग्णालयातच ठेवण्यात येत आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्यांनाही ‘वेटिंग’वर राहावे लागत आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नव्याने २०० खाटा होणार असल्याने, सर्वोपचार रुग्णालयात गंभीर रुग्णांना खाटा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोरोनाच्या रुग्णांसाठी लवकरच अतिरिक्त २०० खाटा उपलब्ध असून, यापैकी १०० खाटांचे सेंटर आठवडाभरातच कार्यान्वित होणार आहे. या दोन्ही सेंटर्समध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.
-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला