महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना गृहविलगीकरणासाठी वसाहतींमध्ये व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:49 AM2021-04-08T10:49:13+5:302021-04-08T10:54:03+5:30
Mahatranscom : निवासस्थानांची उपलब्धता करून द्यावी, अशा सूचना महापारेषण कंपनीच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) कार्यालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
अकोला : महापारेषण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली व त्यांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध झाल्या नाहीत किंवा गृह विलगीकरणाची सोय होत नसल्यास अशा व्यक्तींना कंपनीच्या त्याच अथवा जवळच्या वसाहतींमध्ये रिक्त असलेल्या निवासस्थानांची उपलब्धता करून द्यावी, अशा सूचना महापारेषण कंपनीच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) कार्यालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना महासाथीच्या पृष्ठभूमीवर महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने आधीच कोविड १९ सहाय्यता कक्षाची स्थापना केलेली आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, मोठ्या संख्येने लोक काेरोना बाधित होत आहेत. त्यामुळे या कक्षाचे सुव्यवस्थापन वाढविण्यासाठी महापारेषण मुख्यालयाने सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाची लागण झालेल्या अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात खाटा उपलब्ध न झाल्यास किंवा गृह विलगीकरणाची सोय नसल्यास कंपनीच्या वसाहतीमधील रिक्त निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी निवासस्थाने सुस्थितीत नसतील, तर त्यांची तत्काळ डागडुजी करून ती पुढील आदेशापर्यंत गृह विलगीकरणासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विलगीकरणाच्या कालावधीत खानापानाची व्यवस्था करून देण्याबाबतही सहकार्य करावे, असे कंपनीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
विभागीय प्रशिक्षण केंद्रांचा वापर
गरज पडल्यास गृह विलगीकरणासाठी अतिरिक्त साेय म्हणून महापारेषणच्या नजिकच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रांचा तसेच तेथील प्रशिक्षणार्थींसाठी राखीव असलेल्या निवासस्थानांचा ही वापर करावा, असे परिपत्रकात नमूद आहे.