आज ‘श्रीं’चे आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:01 AM2020-08-22T10:01:18+5:302020-08-22T10:01:38+5:30

मंगलमयी वातावरणात घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

Arrival of Lord Ganesha today! | आज ‘श्रीं’चे आगमन!

आज ‘श्रीं’चे आगमन!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : घरोघरी आनंद, चैतन्य आणि उत्साहाचा वर्षाव करणाऱ्या गणपती बाप्पांचे शनिवारी आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण राजराजेश्वर नगरी सज्ज झाली आहे. मंगलमयी वातावरणात घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी शहरातील मानाच्या व जुने गणपती मंडळांची बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी नसली तरी भक्तिभावात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी लगबग सुरू आहे. शनिवारी श्रीगणेश चतुर्थी आहे. भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी विशिष्ट मुहूर्त नसतो; परंतु प्रात:काळापासून मध्यान्हापर्यंत म्हणजेच सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत गणेशाची स्थापना करता येईल. सार्वजनिक गणेशाची स्थापना सकाळी शक्य नसल्यास दुपारी दीड ते संध्याकाळी साडेसहापर्यंत करता येईल, असे पुरोहितांनी सांगितले.


कुळाचाराप्रमाणे गणेश मूर्ती स्थापन करा!
शनिवार, २२ आॅगस्ट तिथी भाद्रपद श्री गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी श्री गणेशाची मृण्मय मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा कुळाचाराप्रमाणे करावी, श्रीगणेशाचे षोडशोपचारे पूजन करून २१ दुर्वा, शमी, तुळशीपत्रे, लाल फुले, वाहावे, २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा, श्रीगणेशाच्या स्थापनेचे कोणतेही मुहूर्त नाही, त्यामुळे आपल्या सवडीने श्रीगणेशाची स्थापना करावी, अशी माहिती मंगेश गुरुजी पारगावकर यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त हार-फुले, नारळ, खोबराखिस, साखर, मोदक, मोतीचूर लाडू, गुलाल, अगरबत्ती, सुगंधी धूप, हळदी-कुंकू, डेकोरेशन, लाइटिंग, यावरही मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळतो. यावर्षी कोरोना संक्रमणामुळे या व्यवसायातील उलाढाली मंदावली असल्याचे दिसून येते.

 

Web Title: Arrival of Lord Ganesha today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.