अकोला: जिल्ह्यातील देवरी शिवारात तेल्हारा तालुक्यातील काही मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन चराईसाठी आले आहे. गत दि.१८, १९ व २० फेब्रुवारी रोजी तब्बल १२९ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून आहे. मृत मेंढ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, पुण्याला पाठविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाच्या उपचाराखाली ७५ मेंढ्या आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ दाखल झाले आहेत. अकोट तालुक्यातील देवरी शिवारात तेल्हारा तालुक्यातील चार मेंढपाळ ९३० मेंढ्यांच्या कळपासह हजेरी लावली आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास काही मेंढ्यांच्या नाकातून रक्तस्त्राव व झटके येत असल्याने मेंढपाळाने घटनेची माहिती मिळताच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र तोपर्यंत तब्बल ८२ मेंढ्यांचा मृृत्यू झाला होता. गत तीन दिवसांत ९३० मेंढ्यांपैकी तब्बल १२९ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.
मेंढ्यांचा अचानक तत्काळ मृत्यू होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली असता घटनेची गांभिर्याने दखल घेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मेंढ्यांवर उपचार सुरू करण्यात आले. मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्याचा पोस्टमार्टम करण्यात आला असून, त्याचे नमुने पुण्याला पाठविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांच्यासह अकोट तालुका सहाय्यक आयुक्त डॉ. झोंबाळे, डॉ. धुळे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. अहमद, डॉ. पालखेडे, डॉ. पंकज घावट, डॉ. प्रसाद खोळवे आदींसह पशुसंवर्धन विभागाचे पथक होते. सध्या ७५ मेंढ्यांवर उपचार सुरू आहेत.
देवरी परिसरात १२९ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतक मेंढ्यांचा पोस्टमार्टम करण्यात आले असून, नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहे. अहवालानंतर मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. -डॉ. जगदीश बुकतरे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, अकोला.
ही आहेत लक्षणे
अकोट तालुक्यातील देवरी शिवारात तीन दिवसांमध्ये १२९ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. मेंढ्यांना पोटफूगी, झटके येणे आदी लक्षणे दिसून येत आहे. त्यानंतर तत्काळ मृत्यू होत असल्याने मेंढपाळामध्ये भीती पसरली आहे.