आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 05:23 PM2021-06-22T17:23:10+5:302021-06-22T17:23:36+5:30
Asha Workers, Group Promoters agitation at Akola : आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.
अकोला: विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचा १५जूनपासून अनिश्चितकाळासाठी संप सुरू आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील ११०० आशा वर्कर्स व १५० गटप्रवर्तक सहभागी झाले आहे. मंगळवारी सकाळी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, कोरोना काळात आशा व गटप्रवर्तक घरोघरी जाऊन सेवा देत होत्या. तरीही त्यांना ७२ हेडवर तुकड्यांमध्ये मोबदला दिला जातो. त्यांच्याकडून ५ रूपये प्रती कुटूंबाप्रमाणे सर्व्हेक्षण करून घेण्यात आले. शासन मागण्या पूर्ण करणार नाही. तोपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांचे आंदोलन सुरूच राहील. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजन गावंडे, सचिव संध्या डिवरे यांच्या मार्गदर्शनात रूपाली धांडे, संतोष चिपडे, उमा इसायकर, रत्नकला तेलगोटे, माधुरी पतिंगे, कांचन राठोड, कालिंदा देशमुख, कविता डोंगरे, मीना जवनजल, अरूणा वाकोडे, मीना गेबड पाटील यांच्यासह शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.
या आहेत, मागण्या
आशा व गटप्रवर्तकांना शासनसेवेत कायम करून महागाई भत्त्याप्रमाणे १८ हजार रूपये व २१ हजार रूपये वेतनवाढ द्यावी. विमा कवच द्यावे. केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. कोरोनाबाधित आशा व गटप्रवर्तकांना वैद्यकीय बिलाची रक्कम मिळावी., जोखीम भत्ता द्यावा, लसीकरण मोहीमेत काम करण्यासाठी आर्थिक मोबदला द्यावा. कोरोनामुळे ज्या आशा, गटप्रवर्तकांचे पती मयत झाले. त्यांना १० लाख रूपये मदत द्यावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.