हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:49+5:302021-02-06T04:32:49+5:30
बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर ...
बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने हरभरा वाळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तालुक्यात यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे; मात्र हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. अशातच पुन्हा हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
----------------------------
उत्पादन घटणार !
ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे. हरभऱ्यावर घाटे अळी व मर रोगाचे आक्रमण झाल्याने हरभरा पीक वाळत आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
------------------------------------
मुबलक पाणी उपलब्ध असल्याने मी यंदा हरभऱ्याची पेरणी केली; मात्र घाटे धारण अवस्थेत मर रोगाने आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
-शेतकरी.
----------------------------------
हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
- शेतकरी.