अकोला : लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश असल्याने रविवारी शहरातील विविध भागात सुरू असलेल्या दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मनपासह पोलीस पथकातर्फे करण्यात आली. मनपा प्रभारी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार, रविवारी जठारपेठस्थित रत्लम लॉन्स येथे सुरू असलेल्या लग्न सोहळ्यास मनपाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी पथकाला येथे ५०पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आढळून आल्याने पथकातर्फे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुसरी कारवाई ही डाबकी रोडस्थित मनोरथ कॉलनी येथे सुरू असलेल्या लग्न सोहळ्यादरम्यान करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोर ठाकूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पथकातर्फे आयोजकांना पाच हजार रुपयांचा दंड केला. कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, आरोग्य निरीक्षक अमर खोडे, इकबाल खान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करणे तसेच चेहऱ्यावर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसेच प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
लग्नात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती, दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:11 AM