- संजय खांडेकरअकोला : मासिक वीज बिल वितरणाची सिस्टीम अपडेट करण्याच्या प्रयोगात अकोला जिल्ह्यातील जवळपास सव्वापाच लाख ग्राहकांचे डिसेंबर महिन्याचे वीज बिल गायब करण्यात आले आहे. सोबतच फॉल्टी मीटरच्या ग्राहकांना सरासरी दुप्पट वीज बिल आकारले गेले आहे. अतिरिक्त बिल आकारल्या गेल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयाकडे वाढल्या आहेत.ग्राहकांचे वीज बिल ज्याचे त्याच महिन्यात देण्याचा प्रयत्न महावितरण राज्यभरात करीत आहे. अकोल्यातही हा प्रयोग सुरू झाला. अकोल्यात सुरू झालेल्या बिलिंग सिस्टीम अपटेडच्या प्रयोगात महावितरण कंपनीला एक महिन्याचे बिल वितरित करता आले नाही. त्यामुळे स्थिर आकार आणि विलंब शुल्कासह अनेक बाबींमध्ये ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल आकारल्या गेलेत. सर्वात जास्त वीज बिलाची आकारणी फॉल्टी मीटर असलेल्या ग्राहकांवर झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये महावितरणने ग्राहकांकडून अतिरिक्त स्वीकारले आहेत. दोन दिवस वीज बिलाचा भरणा केला नाही, तर दंड आकारला जातो; मात्र कोट्यवधींची अतिरिक्त रक्कम ग्राहकांकडून घेऊनही महावितरणचे अधिकारी गप्प बसले आहेत.अकोला शहर विभागात १ लाख २५ हजारांच्या जवळपास वीज ग्राहक आहेत. अकोला ग्रामीण भागात २ लाख २५ हजार ग्राहक आहेत. जिल्ह्यातील इतर ग्रामीण ग्राहकांची संख्या १ लाख ७० हजारांच्या घरात आहे. जिल्ह्यातील एकूण ग्राहकांची संख्या जवळ जवळ सव्वापाच लाख आहे. उपरोक्त आकडेवारीनुसार शहरातील जवळपास १० टक्के ग्राहकांचे वीज मीटर फॉल्टी आहे, तर ग्रामीण भागात वीज मीटर फॉल्टी असण्याची शक्यता १५ टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच सव्वापाच लाख ग्राहकांपैकी १० ते १५ टक्के ग्राहकांना सरासरी दुपटीचे वीज बिल आकारले गेले आहे. ज्या ग्राहकांना मागील महिन्यात ८०० रुपये बिल होते, त्या ग्राहकास सरासरीच्या नावाखाली थेट १६०० रुपये वीज बिल आकारण्यात आले आहे. एकतर डिसेंबर महिन्याचे बिल दिले गेले नाही अन् जानेवारीत थेट दोन महिन्यांचे अतिरिक्त बिल दिल्या गेल्याने ग्राहक गोंधळले आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन याबाबत विचारणा केली असता, पुढील महिन्यात बिल अॅडजेस्ट करण्यात येईल, असे सांगितले गेले; मात्र ज्या ग्राहकांचे वीज मीटर फॉल्टी आहे, त्यांनाही दुपटीचे वीज बिल दिले गेले. त्यांची रक्कम कशी अॅडजेस्ट होईल, याबाबत अजूनही नागरिक संभ्रमात आहेत.महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अ.भा. ग्राहक पंचायतची तक्रारनियमित वीज बिलाचे वितरण होत नसल्याबाबत आणि अतिरिक्त वीज बिल येत असल्याच्या नागरी समस्यांबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोला जिल्हा शाखेच्यावतीने २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन पाठविले गेले. याबाबत चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी पंचायतचे पदाधिकारी जयप्रकाश पाटील आणि मंजित देशमुख यांनी केली आहे. निवेदनाची दखल आता अधिकारी किती घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील अनेक विभागांत एका विशिष्ट कालावधीमध्ये वीज बिल मिळावे म्हणून सिस्टीम अपडेटचे काम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरचे वीज बिल वितरित झाले नाही. या वर्षात १२ ऐवजी ११ बिलांचे वितरण झाले. यात जे अतिरिक्त बिल वाढून गेले, ते जानेवारीच्या बिलात अॅडजेस्ट करून मिळणार आहे. फॉल्टी मीटर असलेल्या ग्राहकांना थेट दुप्पट वीज बिल आकारले गेले आहे, ते बिलही कमी करून दिले जाईल.- प्रशांत दाणी, कार्यकारी अभियंता, शहर विभाग अकोला.