अकोला महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:31 PM2018-09-19T17:31:43+5:302018-09-19T17:32:17+5:30
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत.
- आशीष गावंडे
अकोला: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला तरी सदर कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेत सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील निर्माणाधीन विकास कामांचा दर्जा काय, असा प्रश्न उपस्थित होण्यासोबतच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत.
केंद्रात आणि राज्यात भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर अकोलेकरांनी महापालिकेची सत्ता भाजपाकडे सोपवली. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. त्यात भरीस भर म्हणून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघही भाजपाच्या ताब्यात सोपवला. भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यास शहरातील विकास कामे झटपट निकाली निघतील, असा अकोलेकरांना विश्वास होता. शहरातून भाजपाचे दोन आमदार असून, योगायोगाने नगर विकास राज्यमंत्री पदही अकोल्याच्या वाटेला आले आहे. शासनाच्या स्तरावर भाजप लोकप्रतिनिधींचा बोलबाला दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा गैरफायदा कंत्राटदारांकडून घेतला जात आहे. आज रोजी मनपातील एक उपायुक्त पद मागील दहा महिन्यांपासून रिक्त आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता, नगररचनाकार यांच्यासह सुमारे डझनभर पदे रिक्त आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे वारंवार शिफारस केल्यावरही शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मनपात उपायुक्त पदावर सुमंत मोरे नियुक्त झाले. सद्यस्थितीत त्यांच्याकडे उपायुक्त प्रशासन व उपायुक्त विकास अशा दोन्ही पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकाºयांवरचा ताण वाढत असला तरी सत्ताधाºयांना त्याचे काहीही सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे. एकूणच भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय वाईट परिस्थितीतून वाटचाल सुरू असल्याने रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील का, असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर विचारत आहेत.
ही पदे आहेत रिक्त!
उपायुक्त ०१
सहायक आयुक्त ०२
उपसंचालक नगररचना ०१
सहा. संचालक नगररचना ०१
मुख्य लेखा परीक्षक ०१
मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी ०१
मुख्य अग्निशमन अधिकारी ०१
शहर अभियंता ०१
कार्यकारी अभियंता (साबांवि) ०१
उपअभियंता ०१
आरोग्य अधिकारी ०१
सहा. मूल्य निर्धारण अधिकारी ०१